पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. आसाममधील पुराचा फटका ३० जिल्ह्यांमधल्या ५४ लाख नागरिकांन बसला असून यामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधला असून राज्यातल्या परिस्थितीची माहिती त्यांच्याकडून घेतली आहे. राज्याला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन मोदींकडून देण्यात आलं आहे.पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आसाममधील पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ मृत्यूमुखी; पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 4:51 PM