नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना या करण्यात येत आहेत. याच दरम्यान अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं, पण आता पुन्हा एकदा नियम शिथील करण्यात आल्याने सर्व गोष्टी हळूहळू सुरू करण्यात आल्या आहेत. वर्क फ्रॉम होम सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता पुन्हा ऑफिसमध्ये बोलावण्यात येत आहे. वर्क फ्रॉम होम सुरू करणं एका कंपनीला चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल 800 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
शिक्षण देणारी कंपनी व्हाईटहॅट ज्युनिअरच्या (WhiteHat Jr) तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम अचानक बंद करून ऑफिसमध्ये बोलवल्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये राजीनामे दिले आहेत. सेल्स, कोडिंग आणि मॅथ टीमच्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांकडून राजीनामे आले आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी कर्मचारी त्यांचे राजीनामे देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीने घरून काम संपवण्याचे धोरण 18 मार्च रोजी ईमेद्वारे जाहीर केलं होतं. ज्यात वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 एप्रिलपर्यंत कार्यालयात परत येण्यास सांगितलं होतं.
व्हाईटहॅट ज्युनिअरने दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या बॅक-टू-वर्क ड्राईव्हचा एक भाग म्हणून आमच्या बहुतेक सेल्स आणि सपोर्ट कर्मचार्यांना 18 एप्रिलपासून गुरुग्राम आणि मुंबई कार्यालयात रिपोर्ट करण्यास सांगितले गेले आहे. आम्ही वैद्यकीय आणि वैयक्तिक गरजांसाठी अपवाद असल्यास रिलोकेशन दिले आहे." त्यानंतर आता वर्क फ्रॉम होमला विरोध करण्यासाठी सर्वांनी राजीनामा दिला आहे.
व्हाईटहॅट ज्युनिअर ही लहान मुलांना ऑनलाईन कोडींग शिकवणारी कंपनी आहे. एका रिपोर्टनुसार, राजीनामा दिलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, एका महिन्याचा कालावधीत ऑफिसमध्ये येऊन काम करणं हे सहज सोपं नव्हतं. काहींना लहान मुले आहेत, काहींना वृद्ध आणि आजारी पालक आहेत, तर इतरांवर इतर जबाबदाऱ्या आहेत. इतक्या कमी कालावधीत कर्मचाऱ्यांना परत बोलावणे योग्य नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.