पटना : बिहारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. येथील खगरियामध्ये एका तरुणाच्या बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचे प्रकरण अजून संपलेले नाही, तोपर्यंत आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आले आहेत. दोन बँक खात्यांमध्ये 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाहिल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना सुद्धा काहीही समजले नाही. (over 900 crore deposited in bank accounts of 2 boys in bihar)
सरकारी किंवा बँक अधिकार्यांच्या निष्काळजीपणानंतर, लोक त्यांचे खाते तपासण्यासाठी बँक किंवा सीएसपी सेंटर गाठत आहेत. बँका आणि सीएसपी सेंटरबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे पैसे त्यांच्या खात्यात आल्याची भीती काही लोकांना आहे. तर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. यावरून काही लोक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच, या घोषणेचे पैसे आता मिळत आहेत का? हे पाहण्यासाठी लोक आपल्या बँक खात्याची माहिती घेत आहेत.
ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहे. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, बिहारमधील शालेय विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसाठी राज्य सरकारकडून पैसे दिले जातात. हे पैसे थेट मुलांच्या बँक खात्यात जमा होतात. गुरुचंद्र विश्वास आणि असित कुमार हे बँक खात्यातील युनिफॉर्मच्या पैशांची चौकशी करण्यासाठी सीएसपी सेंटरमध्ये गेले होते.
यावेळी दोघांना समजले की त्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यावधी रुपये जमा आहेत. हे ऐकून मुलांना धक्का बसला आणि तिथे उपस्थित इतरांनाही धक्का बसला. विद्यार्थी असित कुमारच्या 1008151030208001 या बँक खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाले. तर गुरुचंद्र विश्वास याच्या 1008151030208081 या बँक खात्यामध्ये 60 कोटींपेक्षा रक्कम जमा झाली आहे. दोन्ही खाती उत्तर बिहार ग्रामीण बँक भेलागंज शाखेची आहेत.
दरम्यान, ग्रामीण बँकेच्या भेलागंजचे शाखा व्यवस्थापक मनोज गुप्ता देखील मुलांच्या खात्यातील बॅलन्स पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी दोन्ही मुलांच्या खात्यातून लगेच पैसे भरणे बंद केले आणि खाती गोठवताना ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.