ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १५ - काश्मीर खो-यात शाळांना आगी लावण्याच्या निंदनीय घटना घडत असताना खो-यातील विद्यार्थ्यांनी मात्र आपल्यासाठी शिक्षणच सर्वोच्च असल्याचे दाखवून दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कालपासून बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाली असून राज्यातील तब्बल ९५ टक्के मुलांची परिक्षाकेंद्रांवर हजेरी नोंदवण्यात आली.
हा आकडा फुटीरतावाद्यांना एक सणसणीत चपराक आहे. कारण फुटीरतावाद्यांनी शाळा-कॉलेजेस उघडायला विरोध केला होता. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला सुरक्षापथकांनी कंठस्नान घातल्यापासून काश्मीर खो-यात प्रचंड अस्वस्थतता आहे. मागच्या चार महिन्यांपासून हिंसक विरोध प्रदर्शनामुळे शाळा-कॉलेजेस बंद आहेत.
या आंदोलनांचा खो-यातील शिक्षणाला मोठा फटका बसला आहे. मागच्या चार महिन्यांपासून शाळा सुरु नसल्याने काश्मीरमध्ये बोर्डाच्या परिक्षेसाठी अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला. आजपासून १० बोर्डाची परिक्षा सुरु होत असून खो-यातील १ हजार परिक्षा केंद्रांवर परिक्षा होणार आहे. तीन डिसेंबरपर्यंत या दोन्ही परिक्षा चालणार आहेत. काश्मीरमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा जास्त शाळांना आगी लावण्याच्या निंदनीय घटना घडल्या आहे.