चेन्नई - तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर 2016 मध्ये जवळपास 75 दिवस उपचार करण्यात आले होते. अपोलो रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्या दरम्यान तब्बल 6 कोटी 85 लाख रुपयांचे बिल झाले. महत्त्वाचं म्हणजे जयललितांच्या जेवणावरच फक्त 1.17 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर त्यांना ठेवण्यात आलेल्या रूमचे भाडे जवळपास 24 लाखांहून अधिक झाले आहे.
जयललिता यांचा मृत्यू नैसर्गिक होता का अन्य काही कारण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशी समितीपुढे रुग्णालयात जयललिता यांच्यावर झालेल्या उपचाराचा खर्च सादर करण्यात आला आहे. त्यावेळी या खर्चाची संपूर्ण माहिती देण्यात आली. मात्र ही गोपनीय माहिती आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचे निधन झाले होते. जयललिता यांचा पक्ष म्हणजेच एआयएडीएमकेने एकूण बिलातील 6 कोटी रुपयांची रक्कम भरली आहे तर एका अज्ञात व्यक्तीने उपचारावर झालेल्या बिलातील 41 लाखांची रक्कम भरली आहे. मात्र बिलातील 44 लाख 56 हजारांची रक्कम रुग्णालयाला येणं अद्याप बाकी आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.