सुरेश भटेवरा / नवी दिल्लीचालू रब्बी हंगामात देशातील शेतकऱ्यांना पुरेसे कृषिकर्ज वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी ‘नाबार्ड’कडून सहकारी बँकांना आणखी २० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या कार्योत्तर मंजुरीनुसार, सहकारी बँकांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘नाबार्ड’ २० हजार रुपयांचा हा निधी प्रचलित दराने बाजारातून अल्प मुदतीच्या कर्जाच्या रूपाने उभा करेल. ही रक्कम पुढे शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सहकारी बँकांना ४.५ टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिली जाईल.अधिकृत सरकारी पत्रकानुसार यासाठी ‘नाबार्ड’ला केंद्रीय अर्थसंकल्पातून दोन हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवलही दिले जाईल. यापैकी ५०० कोटी रुपयांच्या भांडवलाचा पहिला हप्ता याच वित्तीय वर्षात दिला जाण्याची शक्यता आहे.दरम्यान देशातील सर्व किसान क्रेडिट कार्डे सहकारी बँकांनी आणि क्षेत्रिय ग्रामीण बँकांनी रुपे कार्ड/ एटीएम सक्षम किसान क्रेडिट कार्डात परिवर्तित करण्याचे काम ‘मिशन मोड’मध्ये करावे आणि या कामी ‘नाबार्ड’ने समन्वयकाचे काम करावे, असेही ठरविण्यात आले आहे.या अतिरिक्त निधीमुळे शेतकऱ्यांना ्ल्प मुदतीची अधिक कृषी कर्जे उपलब्ध होतील व रुपे किसान क्रेडिट कार्ड मिळाल्याने शेतकरी आपले व्यवहार रोखविरहित डिजिटल पद्धतीने विनासायास करू शकतील, अशी सरकारची अपेक्षा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कृषिकर्जांसाठी ‘नाबार्ड’कडून २० हजार कोटींचा जादा निधी
By admin | Published: January 25, 2017 4:09 AM