नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ गोळ्यांनी गंभीर जखमी झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडर चेतन चिताह यांनी अखेर मृत्यूवर मात केली. विश्वास बसणार नाही, पण एवढ्या गोळ्या झेलूनही ते बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.चिताह यांना १४ फेब्रुवारी रोजी श्रीनगर येथून विमानाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) ट्रॉमा विभागात १४ फेब्रुवारी रोजी दाखल केले गेले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चिताह यांनी अति दक्षता विभागातील उपचारांना खूप खंबीरपणे प्रतिसाद दिला, असे सांगितले. हे उपचार दोन महिने चालले. ते कोमामध्ये गेल्याने डॉक्टरांनीही आशा सोडली होती.त्यामुळे एम्समधील ट्रॉमा सर्जरीचे प्रोफेसर सुबोध कुमार चिताह हे बरे झाले आहेत हे जाहीर करताना त्यांचे बरे होणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही, असे उद्गार काढले. चिताह हे कोमा अवस्थेत १६ दिवस होते व नंतर त्यांना महिनाभर अति दक्षता विभागात ठेवण्यात आले. आता ते एवढे बरे आहेत की ते रुग्णालयातून जाऊ शकतात, असे ट्रॉमा सेंटरचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक अमित गुप्ता म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिताह यांची इच्छाशक्ती, धाडसाचे टिष्ट्वटरवर कौतूक करून चिताह पुन्हा सज्ज झालेले मला बघायला आवडेल, असे म्हटले आहे. ते लवकरच मैदानावर परततील अशी आशा आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. ते प्रगती करतील!चिताह यांनी म्हणाले की लष्करप्रमुख बिपीन रावत आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू मला रुग्णालयात भेटायला आले व माझ्या योगदानाची नोंद घेतली याचा मला खूप अभिमान आहे. चिताह यांना काही प्रमाणात अपंगत्व येईल परंतु योग्य ते पुनर्वसन आणि शारीरिक व्यायामामुळे ते प्रगती करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोण आहेत चिताह़?चिताह हे सीआरपीएफच्या ४५व्या बटालियनचे कमांडिंग आॅफिसर. >काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेंदू, उजवा डोळा, दोन्ही हात, पोट व कंबरेखालच्या भागात गोळ्यांमुळे इजा झाल्या होत्या.>आणले तेव्हा गंभीर होते!डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चिताह यांच्या उजव्या डोळ्यात पुन्हा दृष्टी येण्याची शक्यता फारच क्षीण असली तरी धातूच्या तुकड्यांनी इजा झालेल्या डाव्या डोळ्याची दृष्टी पुन:स्थापन झाली आहे. चिताह यांना जेव्हा आणण्यात आले होते, त्या वेळी ते कोमामध्ये होते. त्यांच्या डोक्यात गोळ्यांच्या जखमा होत्या, धड अतिशय वाईटरीत्या मोडलेले होते आणि त्यांच्या उजव्या डोळ्याचे बुबूळ फुटले होते.
नऊ गोळ्या झेलूनही चिताहची मृत्यूवर मात
By admin | Published: April 06, 2017 6:20 AM