नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना (Manmohan Singh) दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत होती. अखेर, डेंग्यू आजारावर मात करुन मनमोहनसिंग घरी परतले आहेत. सिंग याची प्रकृती आता उत्तम असून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली होती. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून ते छातीत श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार करत होते. त्यांना ताप आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने त्यांना एम्सच्या केसी. एन टॉवरमध्ये भरती करण्यात आले. एम्स टीमचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात सिंग यांच्यावर उपचार करण्यात आले. रविवारी त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, आज सोमवारी त्यांना रुग्णलायातून डिस्चार्ज देण्यात आला.
मोदींनीही केली होती प्रार्थना
मनमोहनसिंग यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन, डॉ. सिंग यांची तब्येत लवकरच ठणठणीत होवो, ही प्रार्थना केली होती. तर, माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्विट करुन मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना केली होती.
दरम्यान, मनमोहन सिंग यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना सोडण्यात आले होते. आता, पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता, त्यात डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सिंग यांनी डेंग्युवर मात केली, त्यामुळे रुगणालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.