नवी दिल्ली - संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचं दिसून येतं. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
देशात जे हिंसक आंदोलन सुरु आहे त्याला काँग्रेस जबाबदार आहे. शनिवारी रामलीला मैदानावर राहुल गांधी यांचे रिलॉन्चिंग करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंसक आंदोलन भडकले असा आरोप संबित पात्रांनी केला. ओवैसी नव्या जिन्नासारखे देशात काम करत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नेते अमानतुल्लाह खान आहेत ज्यांना दिल्लीतील जिन्ना बनायचं आहे. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होतं की, बंगालमध्ये राहणाऱ्यांना बंगाली भाषा बोलावी लागेल. मात्र आता हिंदीमध्ये पूर्ण भाषण करत आहेत. पूर्ण देशात वातावरण बिघडावं असं त्यांना वाटतं का असा सवाल भाजपाने केला आहे.
तसेच हिंसक आंदोलन करणाऱ्यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे काय म्हणाले ते ऐकावं. तुम्ही विद्यार्थी असाल पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. पंतप्रधान मोदींनी जे सांगितले त्याने धडा घ्यावा. त्याचसोबत कलम ३७० हटविण्यावरही चिदंबरम म्हणाले होते की, जर जम्मू काश्मीर मुस्लीम राज्य असतं तर हे कलम हटवले नसते. राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीवेळीही ज्याप्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य केलं जात होतं. यावरुन स्पष्ट आहे की, प्रत्येक मुद्द्यावरुन काही लोक हिंदू मुस्लीम असं विभाजन करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी केला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते दुर्दैवी आहे. हा कायदा जो सरकारने आणला आहे त्यात कोणत्याही भारतीयांचे नुकसान नाही. कोणत्याही भारतीयांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मात्र त्यांची माथी भडकावून विद्यार्थ्यांचा वापर करण्याचं काम केलं जात आहे असा आरोप भाजपाने काँग्रेसवर केला.
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी, प्रकाश करात, डी. राजा असे लोक त्याठिकाणी गेले होते. पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रयत्न होताना दिसत आहे. शनिवारी राहुल गांधी यांची रॅली झाली. या रॅलीच्या माध्यमातून रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला अन् दुसऱ्याच दिवशी हिंसाचार वाढला. त्यामुळे या संपूर्ण हिंसक आंदोलनाच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.