नवी दिल्ली : केंद्रातर्फे देण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा तत्काळ स्वीकारावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमआयएमचे अध्यक्ष आणि लाेकसभेचे सदस्य खासदार असदुद्दीन ओवेसी यांना केली. शहा यांनी राज्यसभेत निवेदन देऊन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली. मात्र, ओवेसी यांनी शहा यांची विनंती धुडकावून लावत झेड सुरक्षा पुन्हा नाकारली आहे.उत्तर प्रदेशातील हापुड येथून दिल्लीला जात असताना एका टाेल नाक्यावर ओवेसी यांच्या वाहनावर गाेळीबार झाला हाेता. हल्ल्याबाबत गृहमंत्री शहा यांनी राज्यसभेत निवेदन दिले. त्यांनी सांगितले, की ओवेसी यांच्या वाहनावर तीन गाेळ्या झाडण्यात आल्या हाेत्या. याप्रकरणी दाेघांना अटक करण्यात आली आहे. दाेघांकडून प्रत्येकी एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ओवेसी यांचा कार्यक्रम पूर्वनियाेजित नव्हता.
त्यांच्या दाैऱ्याबाबत स्थानिक प्रशासनाला काेणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. हल्ल्यानंतर त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ते सुरक्षा नाकारत आहेत. मी त्यांना विनंती करताे, की त्यांनी तत्काळ सुरक्षा घ्यावी आणि आम्हाला चिंतामुक्त करावे, असे सांगून शहा यांनी निवेदन संपविले.