एआयएमआयएम प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आता आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आज लोकसभेत शपथ घेतल्यानंतर त्यांनी 'जय फिलिस्तीन' (पॅलेस्टाईन) अशी घोषणा दिली. मात्र प्रोटेम स्पीकर यांनी ते शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकले आहेत. मात्र असे असले तरी, आता यावरून गदारोळ सुरू झाल्याचे दिसत आहे.
यानंतर, लोकसभाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असलेले राधा मोहन सिंह यांनी, शपथेशिवाय कुठलीही गोष्ट रेकॉर्डवर घेतली जाणार नाही, असे आश्वासन सदस्यांना दिले. काही वेळ गदारोळ सुरू होता. यानंतर पुन्हा शपथविधीला सुरवात झाली. प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब पुन्हा अध्यक्षपदावर आले आणि केवळ शपथच नोंदवली जात असल्याचे ते म्हणाले. "मी यापूर्वीच म्हटले आहे की, कृपया शपथेशिवाय दुसरा कसलाही उल्लेख करू नये. याचे पालन व्हायला हवे," असेही ते म्हणाले.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी? -यासंदर्भात एएनआयसोबत बोलताना ओवेसी म्हणाले, "बरेच जण, बरेच काही बोलत आहे. मी म्हणालो, "जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फिलिस्तीन." हे कसे विरोधत आहे? संविधानात तरतूद दाखवा. दुसरे काय म्हणतात हेही आपण ऐकायला हवे. मला जे बोलायचे होते, ते मी बोललो. पॅलेस्टाइनसंदर्भात महात्मा गांधी काय म्हणाले होते एकदा वाचा."
आपण पॅलेस्टाइनचा उल्लेख का केला? असे विचारले असता ओवेसी म्हणाले, "त्या लोकांवर अत्याचार झालेला आहे". यापूर्वी, 2019 मध्ये शपथ घेतल्यानंतर, ओवेसी यांनी "जय भीम, अल्लाह-ओ-अकबर आणि जय हिंद", असे म्हटले होते.