नवी दिल्ली- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या बायका जास्त असतात, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी या प्रकरणात मोदी सरकारला सर्व्हे करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे.सोशल मीडियावर असदुद्दीन ओवैसी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी कोणाच्या बायका जास्त आहेत, यासंदर्भात मोदींना सर्व्हे करण्याचं आव्हान केलं आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही जास्त निकाह करत असून, मुस्लिमांच्या जास्त बायका असतात, असा आरोप केला जातो. 1960 आणि 61च्या वर्षात एक सर्व्हे झाला होता. सर्व्हेतून मुस्लिमांच्या पत्नी कमी, तर इतरांच्या पत्नी जास्त असल्याचं समोर आलं होतं. मी आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो की, हिंमत असल्यास त्यांनी सर्व्हे करावा, त्यातून सर्वकाही समोर येईल.आम्ही इकडे एका पत्नीमुळेच त्रासलेले आहोत. तर दुस-यांकडे दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि बॉसजवळ तर एकच आहे, परंतु तो घरीच नसतो. ज्यांच्याजवळ एकच पत्नी आहे आणि ते दिल्लीत जाऊन बसले आहेत. आम्ही पुष्कळ लग्न करतो, असं बोललं जातं, परंतु त्यात काही तथ्य असल्यास उघड करावं. फक्त तोंडाच्या वाफा न दवडता आम्हाला आकडे द्या, सर्व्हे करा, असंही मोदी सरकारला आव्हान करत असल्याचंही ओवैसी म्हणाले आहेत. हा सर्व्हे समुदायाच्या आधारावर व्हायला हवा, तसेच या सर्व्हेमध्ये ठेवलेल्या बायकांचाही उल्लेख असायला हवा, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
आमच्याहून जास्त बायका हिंदूंच्या, सर्व्हे करून पाहा- ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 7:29 AM