योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
अमेरिकेने काश्मिरमध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी पाकिस्तानने अमेरिकेकडे एका अहवालाद्वारे केली आहे. भारताने काश्मिरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा हास्यास्पद दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचे राजदूत जलील अब्बास जिलानी अमेरिकेचे राजदूत रिचर्ड ओलसन यांना भेले आणि त्यांनी भारतीय लष्कर काश्मिरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा कांगावा केला. अमेरिकेने हस्तक्षेप करावा आणि भारताला समज द्यावी अशी मागणीही नवाझ शरीफ पंतप्रधान असलेल्या पाकिस्तानने अमेरिकेकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रांचं कायम सदस्यत्व असलेल्या अमेरिकेने भारत पुरस्कृत दहशतवाद थांबवावा अशी मागणीही पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानच्या मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही बाब जाहीर केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
गमतीचा भाग म्हणजे याच नवाझ शरीफांनी तीन वर्षांपूर्वी भारताचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची देहाती औरत म्हणून खिल्ली उडवली होती. एनडीटिव्हीच्या बरखा दत्त यांच्याशी न्याहारीच्या वेळी बोलताना शरीफ यांनी सिंग यांची तुलना देहाती औरत अशी केली होती, असे जिओ न्यूजच्या हमीद मिर यांनी सांगितल्यावर ही घटना समोर आली होती.
शरीफांनी सिंग यांचा असा उल्लेख करण्याचे कारण होते, मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानच्या कुरापतींची तक्रार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांकडे केली होती. शरीफ यांनी त्या प्रसंगाच्या संदर्भानं मनमोहन सिंग यांची समोरासमोर न बोलता त्रयस्थाकडे तक्रार करणारी गांवढळ महिला अशी खिल्ली बरखा दत्त यांच्यासी बोलताना उडवली होती.
काव्यात्मक न्याय असा की, आज नवाझ शरीफच पंतप्रधान आहेत, आणि ते अमेरिकेकडे तक्रार करत आहेत, की भारताला आवरा... मनमोहन सिंग यांना देहाती औरत म्हणणाऱ्या नवाझ शरीफांवरच देहाती औरत बनण्याची वेळ आली आहे हाच याचा अर्थ!