अहमदाबाद: शर्यतीत वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे घोडे आणि त्यांच्या डोळे विस्फारायला लावणाऱ्या किंमतींचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले असतील. सध्या गुजरातच्या सुरत येथील एक जातिवंत घोडा असाच चर्चेचा विषय ठरत आहे. अत्यंत दुर्मिळ जातीच्या या घोड्याला विकत घेण्यासाठी राजकारणात प्रसिद्ध असणारे बादल कुटुंबीय आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान कोट्यवधी रूपये मोजायला तयार आहेत. मात्र, या घोड्याच्या मालकाने हे सर्व प्रस्ताव धुडकावून लावले आहेत.
या घोड्याचे नाव 'सकब' (मोहम्मद पैगंबर यांचा घोडा) असे आहे. सुरतच्या ओलपाड येथील सिराज खान पठाण या घोड्याचे मालक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, साधारण वर्षभरापूर्वी बादल कुटुंबीयांनी या घोड्याला विकत घेण्यासाठी 1.11 कोटी रूपये देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान याने नुकतीच या घोड्यासाठी 2 कोटींची बोली लावली होती. मात्र, सिराज खान पठाण यांनी या दोन्ही प्रस्तावांना नकार दिला आहे. त्यामुळे या घोड्याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.
सहा वर्षांचा सकब हा दुर्मिळ प्रजातीचा घोडा असल्याचे मानले जाते. सकब प्रतितास 43 किलोमीटर वेगाने धावू शकतो. सध्या जगात फक्त अमेरिका आणि कॅनडा येथे असणारे दोन जातिवंत घोडेच वेगाच्याबाबतीत त्याच्याशी स्पर्धा करु शकतात. आतापर्यंत सकबने राष्ट्रीय स्तरावर सलग 19 स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानी आणि सिंधी प्रजातीचा संकर असलेला सकब जगातील दुर्मिळ घोड्यांपैकी एक आहे. मात्र, काही जणांच्या मते सकबचा एक डोळा पांढरा आणि एक डोळा काळा असल्यामुळे तो अशुभ आहे. तरीदेखील आजच्या घडीला सकब भारतातील सर्वात महागडा घोडा समजला जातो.
सिराज यांनी राजस्थानमधील पालोटरा जत्रेतून 14.50 लाखांना सकबला विकत घेतले होते. त्यांच्या मते सकबला माणसांची उत्तम जाण आहे. तो कधीतरी समोरून एखादा माणूस जात असेल तर त्याच्या दिशेने जोरात धावत जातो. त्यामुळे त्या माणसाला सकब आपल्या अंगावर येईल की काय, असे वाटते. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी सकब शिताफीने गिरकी घेत त्या माणसापासून दूर जातो. त्याला माणसांचा सहवास अतिशय प्रिय असल्याचे सिराज पठाण यांनी सांगितले.