मुंबई : पोलीस व गौतम नगरमधील महापालिका कर्मचाऱ्यांना तेथील घरांचा मालकी हक्क देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. तसेच रुखी समाजाचे याच ठिकाणी पुनर्वसनासाठीही प्रयत्न करेन, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी येथील रहिवाशांना दिली आहे.पोलिसांना सध्या राहत असलेल्या घराचा मालकी हक्क मिळावा, यासाठी वरळी व नायगांव येथील पोलीस कुटुंब गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. यासाठी उच्च न्यायालयात एक याचिकाही प्रलंबित आहे. वेळोवेळी यासाठी आंदोलन करण्यात आले. पण अजूनही या प्रश्नाचे घोंगडे सरकारने भिजत ठेवले आहे. मात्र या विभागातील पोलीस मतदारांनी मला संधी दिल्यास प्रथम पोलिसांना घराचा मालकी हक्क देण्याचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी हमी कोटेचा यांनी यावेळी दिली.तसेच गौतम नगर येथील पालिका वसाहतीतील घरे देखील या कर्मचाऱ्यांच्या नावे केली जातील. यातील अडथळे तत्काळ दूर केले जातील. या सोबतच याच विभागातील रुखी समाजाचे पुनर्वसन येथेच केले जाईल, असे आश्वासनही कोटेचा यांनी येथील रहिवाशांना दिले आहे. (प्रतिनिधी)
पालिका कर्मचा-यांना मालकी हक्काची घरे
By admin | Published: October 10, 2014 2:52 AM