नवी दिल्ली : ऑक्सफर्डची विद्यापीठातील संशोधनातून जी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे, तिचे ३०० ते ४०० दशलक्ष डोस यावर्षी डिसेंबरपर्यंत तयार होणार आहेत. पुढील वर्षी मार्चपर्यंत सर्वांना मिळू शकेल, इतके डोस तयार होतील. या प्रकल्पात सहभागी असलेल्या सेरम इन्स्टिटयूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीच ही माहिती दिली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस प्रकल्पाचे संचालक अँर्ड्यू जे पोलार्ड आणि पूनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ही दिलासा देणारी माहिती समोर आली. पोलार्ड म्हणाले की, अँटीबॉडी रिस्पॉन्सवरून ही लस खूप उपायकारक व सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मात्र, आम्हाला ही लस कोरोना विषाणूंपासून वाचवू शकते, याचे पुरावे हवे आहेत. या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाणार आहे. याचा अभ्यास केला जाईल, त्याचे दुसऱ्या लोकांवरील परिणाम पाहिले जातील.
किंमत १ हजार रुपये
ऑक्सफर्डचीने तयार केलेली लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सोमवारी करण्यात आला होता. त्यानंतर लगेच मंगळवारी सेरम इन्स्टिटयूटने डिसेंबर ते मार्चपर्यंत सर्वांना लस उपलब्ध होईल, अशी घोषणा केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला म्हणाले की, लसीच्या एका डोसची किंमत एक हजार रुपये इतकी असेल. भारतात ही लस सेरम तयार करणार आहे.
कोवॅक्सीनच्या चाचण्या
भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या लसीची चाचणी एम्समध्ये गुरुवारी सुरू होत आहे. त्यासाठी स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. या लसीच्या पहिल्या दोन चाचण्या लवकरच पार पडतील, असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोनाविरोधी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सांगितले.