OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी निधन झाले. गुडगावमधील एका उंच इमारतीवरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ओयोच्या प्रवक्त्याने रितेश अग्रवाल यांच्या वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यासोबतच रितेश अग्रवालनेही एक निवेदन जारी करुन वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले.
20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यूडीसीपी पूर्व गुरुग्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता रमेश अग्रवाल यांचा 20 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. ते डीएलएफ क्रिस्टा सोसायटीत राहत होते. घराच्या बाल्कनीतून ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी मुलगा रितेश अग्रवाल, सून आणि त्यांची पत्नी घरातच होते. विशेष म्हणजे, 7 मार्च रोजी रितेश अग्रवालचे गीतांशा सूदशी लग्न झाले आहे. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनी ही दुःखद घटना घडली.
'आमच्या गोपनीयतेचा आदर करा'रितेश अग्रवाल म्हणाले- 'जड अंत:करणाने कळवू इच्छितो की, माझे वडील रमेश अग्रवाल यांचे 10 मार्च रोजी निधन झाले. ते पूर्ण आयुष्य आनंदाने जगले आणि माझ्यासह अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.'
तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले7 मार्च रोजी रितेश अग्रवाल आणि गीतांशा सूदचे लग्न झाले. त्यांनी दिल्लीत एक भव्य रिसेप्शन पार्टीही दिली होती, ज्यामध्ये देशातील आणि जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. पेटीएमचे सीईओ विजय शेखर ते सॉफ्टबँकचे प्रमुख मासायोशी सोन यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली होती. रितेश अग्रवाल हा देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहे. त्याने 2013 मध्ये ओयो रुम्स सुरू केले.