नवी दिल्ली: हॉस्पिटॅलिटी चेन ओयोचे (oyo) संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मार्चमध्ये त्यांचे लग्न होणार असून, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आणि त्यांना लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले. ट्विटरवर त्यांनी फोटो शेअर करुन ही माहिती दिली.
त्यांनी ट्विट करून लिहिले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आम्ही एका नवी सुरुवात करत आहोत. ज्या उत्साहाने त्यांनी आमचे स्वागत केले, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. उत्तर प्रदेशमधील त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाने माझी आई प्रेरित होऊन त्यांना भेटण्यास उत्सुक होती. तुमचा मौल्यवान वेळ आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.'
पुढच्या महिन्यात अग्रवाल विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील एका 5-स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे. अग्रवाल या तरुण उद्योजकाचा जन्म ओडिशा राज्यातील मारवाडी कुटुंबात झाला आणि 2011 मध्ये कॉलेजच्या अभ्यासासाठी ते दिल्लीला गेले. दोन वर्षांनी त्यांनी कॉलेज सोडले. यानंतर फेलोशीपमध्ये मिळालेल्या पैशातून त्यांनी 2013 मध्ये OYO लाँच केले.
आज कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी हॉस्पिटॅलिटी कंपनी म्हणून उदयास आली आहे. अलीकडेच, अग्रवालने खुलासा केला की, ओयो हॉस्पिटॅलिटी चेन इंडोनेशियातील सर्वात मोठे हॉस्पिटॅलिटी टेक प्लॅटफॉर्म झाली आहे. आज 180 हून अधिक शहरांमध्ये 2,500 हून अधिक विशेष OYO हॉटेल्स उपलब्ध आहेत.