नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेच्या बिकट अवस्थेवरुन मोदी सरकारला वारंवार लक्ष्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या जागी मी असतो आणि माझे निर्णय अशाच प्रकारे चुकले असते, तर मी राजीनामा दिला असता, असंदेखील ते पुढे म्हणाले. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीला चिदंबरम यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.अर्थव्यवस्था वाढीचा वेग, महागाई, औद्योगिक उत्पादन याबद्दलची आकडेवारी देत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्था संकटात असल्याचं म्हटलं. 'खाद्यपदार्थांशी संबंधित महागाई १० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. कारखानदारीच्या वाढीचा वेग ३.८ टक्क्यांवर आला आहे,' असं चिदंबरम म्हणाले. यंदाचं आर्थिक वर्ष संपताना विकास दर वाढीचा वेग ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. जुन्या निकषांच्या आधारे पाहायला गेल्यास हा दर केवळ ३ ते ३.५ टक्के इतका असेल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अर्थचक्राचाच भाग असल्याचा मोदी सरकारचा दावा चिदंबरम यांनी पूर्णपणे खोडून काढला. सध्या निर्माण झालेली परिस्थिती अर्थचक्राचा भाग असल्याच्या दाव्यावर केवळ दोनच व्यक्ती विश्वास ठेवू शकतात. त्यातील एक व्यक्ती म्हणजे अर्थमंत्री आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार, असा टोला त्यांनी लगावला. आर्थिक मंदी रचनात्मक असल्याचं अर्थक्षेत्रातील जाणकारांचं मत असून त्या संदर्भात सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. मोदी सरकारनं केलेल्या दोन गंभीर चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचं त्यांनी सांगितलं. निश्चलीकरण ही अतिशय मोठी चूक होती. वस्तू आणि सेवा कराची सरकारनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं केली. सरकारनं कर आणि तपास यंत्रणांच्या हाती बरेचसे अधिकार दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली, अशा शब्दांत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं.
निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा- चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:07 PM