नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची बुधवारी सीबीआयने आयएनएक्स मीडियाच्या थेट परकीय गुंतवणूक प्रकरणात चौकशी केली. सीबीआयच्या मुख्यालयात ही चौकशी करण्यात आली. पी. चिदम्बरम यांची काल, मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ही चौकशी केली होती.आपल्याविरोधात ना गुन्हा नोंदविला आहे, ना एफआयआर दाखल झाला आहे. तरीही माझी चौकशी केली जात आहे, असे चिदम्बरम यांनी काल ईडीच्या चौकशीनंतर म्हटले होते. चिदम्बरम अर्थमंत्री असताना २00७ मध्ये आयएनएक्स मीडियाच्या ३0५ कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्डाने मंजुरी दिली होती. यात अनियमितता असल्याचा आरोप असून,त्याची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. माजी माध्यमसम्राट पीटर मुखर्जी आणि त्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांची ही कंपनी आहे. मुखर्जी पती-पत्नी त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहेत.याप्रकरणी सीबीआयने १५ मे रोजी एफआयआर दाखल केला होता. चिदम्बरम यांचे पुत्रकार्ती चिदम्बरम यांना या प्रकरणात याआधीच अटक झाली होती.त्यांना १0 लाख रुपये मिळाल्याचा आरोप आहे.
पी.चिदम्बरम यांची सीबीआयकडूनही झाली चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:31 AM