गुजरातच्या साबरमतीमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. यावेळी साबरमती आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अचानक माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम हे बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेते, स्थानिक लोक आलेले होते. कार्यकर्त्यांनी चिदंबरम यांना तातडीने उचलून नेत रुग्णवाहिकेतून पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. चिदंबरम यांच्या प्रकृतीबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. पक्षाच्या ८४ व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पी. चिदंबरम आज अहमदाबादला पोहोचले होते.
चिदंबरम यांना उचलून नेतानाचा व्हिडीओ आला आहे. एएनआयने याचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या चिदंबरम यांना काँग्रेसचे काही कार्यकर्ते उचलून नेताना दिसत आहेत.
उष्णता आणि डिहायड्रेशनमुळे पी चिदंबरम यांना चक्कर आली होती. त्यांना झायडस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर सध्या त्यांना तपासत असून ते ठीक असल्याचे ट्विट, खासदार कार्ती चिदंबरम यांनी केले आहे.
अधिवेशनात काय काय ठरणार...गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी आजपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होईल. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात देशातील काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी अहमदाबाद येथे आलेले पक्षाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले की, आम्ही देशाच्या वर्तमान परिस्थितीचा सामना करण्यासाठी रणनीतीवर चर्चा करू.