नवी दिल्ली - ‘आयएनएक्स मीडिया’ कंपनीत सात वर्षांपूर्वी 305 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी (22 ऑगस्ट) दिला आहे. चिदंबरम यांच्या अटकेनंतर त्यांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. चिदंबरम यांच्या कुटुंबियांनी घोषित केल्याप्रमाणे ते जवळपास 175 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र तपास यंत्रणांनी त्यांची संपत्ती ही घोषित करण्यात आलेल्या संपत्तीच्या कित्येक पटीने जास्त असल्याचा आरोप केला आहे.
चिदंबरम आणि त्यांच्या पत्नीकडे तब्बल 95.66 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 5 कोटी रूपयांचं कर्ज असल्याचं चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही त्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. तसेच चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्याकडेही 80 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. 2014-2015 त्यांनी पत्नी आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 9.75 कोटी असल्याचं सांगितलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चिदंबरम यांच्याकडे पाच लाखांची रोख रक्कम तसेच बँक आणि अन्य संस्थामध्ये 25 कोटी जमा आहेत. त्यासोबतच 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आणि पोस्ट ऑफिस योजनांमध्येही त्यांनी 35 लाखांची गुंतवणूक केली आहे. जवळपास दहा लाखांचा विमा, 85 लाखांचे दागिने आणि 27 लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये 1.5 कोटी, 7 कोटींची शेतजमीन आणि 32 कोटी रूपयांची घरे देखील चिदंबरम यांच्याकडे आहेत. चिदंबरम तीन गाड्यांचे मालक आहेत. होंडा, टोयोटा इनोव्हा आणि स्कोडा अशा 27 लाखांच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. ईडीने आतापर्यंत त्यांची 54 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत, ब्रिटन आणि स्पेनमधील संपत्तीचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टात काय होणार?
‘सीबीआय’ व ‘ईडी’ने दाखल केलेल्या दोन स्वतंत्र प्रकरणांत दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिले केली आहेत. ती शुक्रवारी न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे येतील. ‘सीबीआय’च्या प्रकरणात आधीच अटक झाल्याने त्यासंबंधीचे अपील आता निरर्थक झाले आहे. मात्र ‘ईडी’च्या प्रकरणात अटक झाली नसल्याने त्यात अटकपूर्व जामिनाचा विषय अजूनही जिवंत आहे.