ठाणे: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तुटपुंज्या अनुदानावारून प्रधानमंत्री मुद्रा योजनेची खिल्ली उडविली. ते रविवारी ठाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत लघुद्योगांना 10 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत या योजनेतंर्गत वितरीत करण्यात आलेली सरासरी रक्कम 43 हजार इतकीच आहे. इतक्या कमी पैशात कोणत्याही उद्योजकाला भरीव गुंतवणूक करता येणे शक्य नाही. त्यामुळे एवढ्याशा पैशात फक्त पकोड्याचा स्टॉलच सुरू करता येणे शक्य आहे, असा टोला पी. चिदंबरम यांनी मोदींना लगावला. काही दिवसांपूर्वी देशातील वाढत्या बेरोजगारीवरून सरकारवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करताना नरेंद्र मोदींनी पकोड्याचे उदाहरण दिले होते. रोजगार म्हणजे केवळ नोकऱ्या नव्हेत. एखादा व्यक्ती पकोड्याचा स्टॉल चालवत असेल तर तोदेखील एकप्रकारचा रोजगारच आहे, असे मोदींनी म्हटले होते. यावरून विरोधकांनी मोदी सरकार प्रचंड टीकाही केली होती. याशिवाय, पी. चिदंबरम यांनी कार्यक्रमात सरकारच्या आर्थिक व सामाजिक धोरणांवरही टीका केली. भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर केलेल्या चुका एकवेळ सुधारता येतील. पण भाजपाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेला सामाजिक घोळ निस्तरता येणे अवघड आहे. भाजपाच्या निर्णयांमुळे समाजातील काही घटकांपर्यंत चुकीचा संदेश गेला आहे. या लोकांना अचानकपणे आपण दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत, असे वाटायला लागले आहे. याशिवाय, भाजपा सरकारच्या काळात खानपानाच्या पद्धती आणि सामाजिक वर्तनावरूनही अनेक वाद निर्माण झाल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले.
इतक्याशा पैशात फक्त पकोड्याचा स्टॉलच काढता येईल; चिदंबरम यांनी उडविली मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची खिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 8:46 AM