चेन्नई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी '56 इंचाची छाती' विधानावरुन पंतप्रधान नरेंद मोदी यांची कोपरखळी घेतली आहे. भगवान हनुमानाची तरी छाती 52 इंच एवढी होती का?, यावरही माझा विश्वास बसत नाही, असं म्हणत चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली आहे.
चेन्नईतील एका समारंभामध्ये संबोधित करताना पी. चिदंबरम यांनी हे विधान केले आहे. यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. 'कोणाची छाती 52 इंचाची आहे?. रामायणातील एक कथा मी ऐकली होती, यामध्ये हनुमान आपली छाती चिरुतो, असे सांगण्यात आले आहे. पण भगवान हनुमानाचीही छाती 52 इंचाची असेल, यावर माझा विश्वास नाही', असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली.
दरम्यान, यावेळेस चिदंबरम यांनी नोटांबदी निर्णयावरुनही मोदी सरकारवर निशाणा साधला. 'नोटाबंदी आणि यांसारख्या अन्य कारणांमुळे आम्ही मोदी सरकारचा विरोध करत आहोत. नोटाबंदी निर्णय योग्य नसल्याचे अरविंद सुब्रमण्यन यांनीही अप्रत्यक्षरित्या सांगितले होते. सर्व चुका केवळ एकाच व्यक्तीनं केल्या आहेत. ज्यांनी नोटाबंदी निर्णय अंमलात आणला, त्यांनीच जीएसटीसारखीही चूक केली', अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला.
(हनुमान मुसलमान होते, भाजपाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात हनुमानाच्या जातीवरुन सुरू असलेली चर्चा आता हनुमानाच्या छातीच्या मापापर्यंत पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्त हनुमान दलित आणि वंचित होते, असा शोध लावला होता. "बजरंगबली असे लोकदैवत आहेत जे वनवासी, दलित आणि वंचित आहेत'', असे विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी, उत्तर प्रदेशातील एका संघटनेनं योगी आदित्यनाथ यांना माफी मागण्यास सांगत नोटिसही बजावली होती.