नवी दिल्ली : नासाच्या स्पेस टेलिस्कोपमधून पहिल्यांदाच विश्वातील काही छायाचित्रे शेअर करण्यात आली. नासाचे हे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रिट्विट केले होते. यावरुन काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारामण यांना चांगलाच टोला लगावला आहे. मुख्य आर्थिक सल्लागाराच्याऐवजी आता नवा मुख्य आर्थिक ज्योतिषी नियुक्त करा, असे त्यांनी म्हटले आहे.
देशात महागाईचा दर 7.01 टक्क्यांवर तर बेरोजगारीचा दर 7.80 टक्क्यांवर पोहोचलेला असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अवकाशातील गुरु, प्लुटो आणि युरेनस ग्रहांचे फोटो ट्विट केल्याबद्दल आम्हाला आजितबात आश्चर्य वाटलेलं नाही, असे पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, स्वतःच्या कौशल्यातून आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या कौशल्यांवरून आशा गमावल्यामुळे, अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी ग्रहांना आवाहन केल्याचे सांगत हे सुरू करण्यासाठी त्यांनी नवीन सीईए म्हणजेच मुख्य आर्थिक ज्योतिषी नियुक्त करावे, असा टोला पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारामण यांना लगावला आहे.
बुधवारी काँग्रेसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर टीका केली होती. यावेळी देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असताना तिच्या रिकव्हरी ऐवजी निर्मला सीतारामण यांना युरेनस आणि प्लुटोमध्ये जास्त रस असल्याचे म्हटले होते. दरम्यान, पी. चिदंबरम यांनी नुकतेच अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी ट्विट केले होते की, "2022-23 साठी 6.4 टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य निश्चित केल्यानंतर काही महिन्यांतच सरकार मागे जात आहे. आता सरकार वित्तीय तूट 6.7 टक्के ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहे. 2021-22 मध्येही वित्तीय तुटीची समान पातळी होती."