नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, याविरोधात काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली, यात त्यांचा चष्माही जमिनीवर पडला, तसंच डावीकडील बरगड्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. त्यांनी एक व्हिडीओ जारी केला. “संपूर्ण दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. खासदार शक्ती सिंग गोहील यांच्यावर हल्ला करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली,” असं ते म्हणाले.
“खासदार प्रमोद तिवारी यांना रस्त्यावर ढकलण्यात आलं. त्यांच्या डोक्याला इजा झाली आणि त्यांच्या बरड्यांमध्येही फ्रॅक्टर आहे. ही लोकशाही आहे का?, विरोध करणं गुन्हा आहे का?,” असा सवालही सुरजेवाला यांनी केला. दरम्यान, विरोधकांच्या दाव्यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.