नवी दिल्ली - तेलंगणाच्या सिद्दीपेटच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पी व्यंकटरामी रेड्डी (P Venkatrami Reddy) यांनी अचानक राजीनामा दिला आहे. यानंतर आता त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रशासकीय अधिकारी असलेल्या रेड्डी यांच्या सेवेचा एका वर्षांचा कालावधी अद्याप बाकी होता. मात्र राजकारणाच्या क्षेत्रात उतरण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के चंद्रशेखर राव यांच्या पायाला हात लावल्याने ते चर्चेत आले होते. आता रेड्डी यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
व्यंकटरामी रेड्डी यांनी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना, आयएएस अधिकारी म्हणून काम करताना मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला. त्यामुळे राज्यासाठी मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी पाहायला मिळाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. रेड्डी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाच्या तिकीटावर राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
चंद्रशेखर राव यांच्या पायाला हात लावणाऱ्या रेड्डी यांचा फोटो व्हायरल
रेड्डी यांनी 1996 साली ग्रुप 1 अधिकारी म्हणून उप-जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 2007 साली त्यांना बढती मिळाली. गेल्या काही वर्षांत त्यांनी संयुक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली. रेड्डी सिद्दीपटे, संगारेड्डी आणि रंजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यांच्या दंडाधिकारी पदावरही त्यांनी काम केलं आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य राज्यात रिअल इस्टेटच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्दीपेट जिल्हा जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पायाला हात लावणाऱ्या जिल्हाधिकारी पी व्यंकटरामी रेड्डी यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर ते चर्चेचा विषय ठऱले होते.
रेड्डी लवकरच TRS पक्षात दाखल होण्याची शक्यता
मुख्यमंत्री राव यांच्या निकटवर्तीयांमध्येही त्यांचा समावेश होतो. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडण्याच्या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. राजीनामा सोपवल्यानंतर रेड्डी लवकरच TRS पक्षात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विधानपरिषद जागेवर त्यांची वर्णी लागणार असल्याची राजकीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 29 नोव्हेंबर रोजी आणि एलएसी कोट्यातील 12 जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे