नितीन आगरवाल
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराठी स्थापलेल्या राम मंदिर तीर्थक्षेक्ष ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी २ एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.
ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तोपर्यंत ६७ एकर जमिनीचा ताबा ट्रस्टकडे सोपविण्याचे काम उत्तर प्रदेश सरकार करेले. मशिदीसाठी जमीनही वक्फ बोर्डाकडे सोपविण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारमार्फत होणार आहे. ती जमीन वक्फ बोर्डाने स्वीकारल्यास मंदिर बांधणीत कोणतीही अडचण राहणार नाही.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ के. परासरन यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रस्ट काम करणार असला तरी अध्यक्षपद महन्त नृत्यगोपाल दास यांच्याकडे आहे. मंदिर समितीच्या अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा काम पाहतील. महासचिव म्हणून विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची नियुक्ती करण्यात आली.मंदिराचे बांधकाम कधी सुरू करायचे, हे नृपेंद्र मिश्रा ठरवतील. गोविंद देवगिरी महाराजांना कोषाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. अयोध्येतील स्टेट बँकेत ट्रस्टचे खाते सुरू करण्यात येईल. बँक खात्याचे काम गोविंद देवगिरी महाराज, चंपत राय व डॉ. अनिलकुमार मिश्रा पाहतील. ट्रस्टवर उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून सनदी अधिकारी अवनीश अवस्थी व अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांना घेण्यात आले आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश कुमार असतील.२0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते २0२४ पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका २0२४ मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल.