ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - भारत अमेरिकेकडून आणखी चार पोसीडॉन - ८ आय विमाने विकत घेणार आहे. भारताने बुधवारी अमेरिकन कंपनी बोईंगबरोबर यासंबंधीचा एक अब्ज डॉलरचा खरेदी करार केला. पोसीडॉन - ८ आय ही सागरी टेहळणी आणि पाणबुडी विरोधी विमाने आहेत. या कराराबरोबरच भारताचे अमेरिकेबरोबरचे शस्त्रास्त्र खरेदी करार १५ अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे.
जून महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या व्यवहाराला मंजुरी दिली होती. जून २०१३ ते ऑक्टोंबर २०१५ दरम्यान नौदलाच्या ताफ्यात आठ पी-आय विमाने दाखल झाली. २००९ मध्ये या विमानाच्या खरेदीचा करार झाला होता.
नव्या करारातील पहिले विमान तीन वर्षांच्या आत नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. हारपून ब्लॉक क्षेपणास्त्राने सज्ज असणारी ही विमाने टेहळणी बरोबरच शत्रूच्या पाणबुडयांनाही लक्ष्य करु शकतात. या विमानांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.