नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी वर्षभराच्या तपासानंतर तयार केलेल्या आरोपपत्रात हवामान तज्ज्ञ आर. के. पचौरी यांना महिलेचा शीलभंग, लैंगिक अत्याचार आणि धमकावण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे. साक्षीदारांचा जाबजबाब आणि फोनवरील संभाषणाची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी पचौरी यांना दोषी ठरविले आहे.५०० पानांचे हे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्याआधी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे त्याची नीट छाननी केली जात आहे. पचौरी यांनी दि एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे (टेरी) महासंचालक म्हणून ‘आपल्या पदाचा दुरुपयोग’ केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे या आरोपपत्राच्या शेवटी म्हटले आहे.एक वर्षापूर्वी दिल्ली पोलिसांनी ७५ वर्षीय पचौरी यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध चार कलमान्वये गुन्हे दाखल केले होते आणि आता त्याच गुन्ह्यांखाली त्यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. टेरीच्या एका महिला कर्मचाऱ्याने पचौरी यांच्या विरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. पचौरी यांनी फेब्रुवारी २०१४ आणि मार्च २०१५ या दरम्यान आपल्या मोबाईल फोनवरून तक्रारकर्त्या महिलेला एकूण ३४ वेळा कॉल केला, तर तक्रारकर्त्या महिलेने त्यांना २६ वेळा कॉल केला, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. याशिवाय सप्टेंबर २/१३ आणि फेब्रुवारी २०१५ या काळात पचौरी व महिलेदरम्यान आदानप्रदान करण्यात आलेल्या सहा हजारावर एसएमएस आणि व्हॉट्स अॅपचा तपशील त्यात दिलेला आहे.आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अज्ञात इसमांकडून ‘हॅक’ करण्यात आले होते, हा पचौरी यांचा युक्तिवाद पोलिसांनी फेटाळून लावला आहे. तथापि याबाबतचा फोरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेचा अहवाल मात्र प्राप्त व्हायचा आहे. पोलीस या अहवालाची प्रतीक्षा न करता आरोपपत्र न्यायालयात दाखल करणार असल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आपण पचौरी यांच्या कार्यालयात रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (३ सप्टेंबर २०१३) त्यांनी आपल्याला एसएमएस पाठविला. यापुढे मी तुला लाईफ (लवली इन्स्पिरेशन आॅफ एक्सेसिव्ह फौंडनेस) असे संबोधणार असल्याचे लिहिले होते. त्यानंतर पचौरी हे अश्लील विनोद आणि कविता असलेले एसएमएस रोजच पाठवायचे,’ असे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे.
पचौरींविरुद्धचे आरोपपत्र तयार
By admin | Published: February 16, 2016 3:15 AM