नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पद्मविभूषणसाठी एकूण चार नावांची निवड करण्यात आली आहे. यातील तिघांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये दिवंगत माजी CDS जनरल बिपिन रावत (मरणोत्तर), दिवंगत भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (मरणोत्तर), राधेश्याम खेमका (मरणोत्तर) आणि प्रभा अत्रे यांच्या नावांचा समावेश आहे. यंदा पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये 128 जणांची नावे आहेत.
याशिवाय, काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांना पद्मभूषण, बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांना पद्मभूषण, माजी गृहसचिव राज राजीव महर्षी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारत बायोटेकचे संस्थापक कृष्ण लीला आणि त्यांच्या पत्नीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नीरज चोप्रा यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.