नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि ज्यांच्या जीवनकथा लोकांना सकारात्मक संदेश देऊ शकतात अशा अविस्मरणीय वीरांचा देशाने गौरव केला आहे. या यादीत ३४ नायकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पारबती बरुआ (प्रथम महिला माहुत), जागेश्वर यादव (आदिवासी कार्यकर्ता), चामी मुर्मू (आदिवासी पर्यावरणवादी आणि महिला सक्षमीकरण) या नावांचा समावेश आहे.
पारबती बरुआ : पहिली महिला माहुत
आसामच्या पार्वती बरुआ या ६७ वर्षांच्या आहेत. त्यांना सामाजिक कार्य (प्राणी कल्याण) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारबती, भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत ज्यांनी पारंपारिकपणे पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:साठी एक स्थान निर्माण करण्यासाठी प्रथेला छेद दिला. आणि त्यासाठी वचनबद्ध राहिली. मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारांना मदत केली. वन्य हत्तींना कसे पकडायचे आणि त्यांच्या समस्येचा सामना कसा करायचा यासाठी त्यांच्या वैज्ञानिक पद्धती प्रभावी होत्या.
पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. या कार्यात गेल्या ४ दशकापासून त्या कार्यरत आहेत. हत्तीपासून अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. सामान्य जीवन जगणे आणि लोकांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घालणे हे त्यांचे ध्येय बनले.
जागेश्वर यादव : बिरहोरचा भाऊ
जशपूर येथील आदिवासी कल्याणासाठी झटणारे कार्यकर्ते जागेश्वर यादव यांचीही पद्मश्रीसाठी निवड झाली आहे. छत्तीसगडचे जागेश्वर यादव ६७ वर्षांचे आहे. त्यांना सामाजिक कार्यासाठी (आदिवासी - पीव्हीटीजी) पद्म पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्यांनी आपले जीवन उपेक्षित बिरहोर आणि पहाडी कोरवा लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. जशपूरमध्ये आश्रम स्थापन केला. तिथे शिबिरे उभारून निरक्षरता दूर करण्यासाठी आणि मानक आरोग्य सेवा सुधारण्याचे काम केले. महामारीच्या काळात त्यांनी भीती दूर करून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली. आर्थिक अडचणी असूनही सामाजिक बदल घडवून आणण्याची त्यांची तळमळ कायम राहिली.