नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी, माजी राज्यपाल जगमोहन, अभिनेते अनुपम खेर आणि अजय देवगण, आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर, झिरो बजेट निसर्गशेतीचे जनक सुभाष पाळेकर (अमरावती), तसेच बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसह विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना सोमवारी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रविशंकर, प्रख्यात नृत्यांगणा यामिनी कृष्णमूर्ती, माजी नियंत्रक व महालेखाकार (कॅग) विनोद राय, लोकगायिका मालिनी अवस्थी, ‘कृडी संत’ सुभाष पालेकर आणि प्रख्यात शेफ मोहम्मद इम्तियाज कुरेशी यांच्यासह ५६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.प्रख्यात वास्तुशिल्पकार हफीज सोराब कॉन्ट्रॅक्टर, अजित वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ बरजिंदर सिंग हमदर्द, बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर, बांधकाम क्षेत्रातील दिग्गज आणि शापूरजी पालोनजी समूहाचे पालोनजी शापूरजी मिस्त्री, सायना नेहवाल, माजी कॅग विनोद राय, प्रख्यात शास्त्रज्ञ अल्ला वेंकट रामाराव आणि हैदराबाद येथील आशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएंटोरोलॉजीचे अध्यक्ष दुव्वूर नागेश्वर रेड्डी यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये इस्रो सॅटेलाईट सेंटरचे संचालक मायलस्वामी अण्णादुरई, लोकगायिका मालिनी अवस्थी, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, हार्मोनियम वादक पं. तुलसीदास बोरकर, अभिनेता अजय देवगण, महाराष्ट्रातील ‘कृषिसंत’ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी सुभाष पालेकर, शेफ मोहम्मद कुरेशी यांचा समावेश आहे.सुपरस्टार रजनीकांत, अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांना पुढच्या महिन्यात आयोजित स्वतंत्र समारंभात हा पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पाच पद्मविभूषण, आठ पद्मभूषणया समारंभात राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते पाच पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.अंबानींना मरणोत्तर पद्मविभूषणधीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांची पत्नी कोकिळाबेन अंबानी यांनी स्वीकारला. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव आरआयएलप्रमुख मुकेश अंबानी आणि रिलायन्स एडीएचे अध्यक्ष अनिल अंबानी उपस्थित होते. अंबानी यांच्याशिवाय अमेरिकेत स्थायिक झालेले अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन, यामिनी कृष्णमूर्ती आणि रविशंकर यांनाही पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.
५६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान
By admin | Published: March 29, 2016 2:53 AM