नवी दिल्ली – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने रविवारी निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. दुपारी त्यांना ह्दयसंदर्भातील समस्येमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना अपयश आलं आणि राजन मिश्रा यांचा प्राणज्योत मालावली.
कोण होते राजन मिश्रा?
राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारनं गौरवण्यात आलं. बनारस घराण्याशी ते संबंधित होते. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड, ऑस्ट्रिया, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटेन, यूएसएसआर, कतार, बांगलादेशसह अनेक देशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
राजन-साजन मिश्रा यांची प्रसिद्ध जोडी
राजन आणि साजन मिश्रा हे दोघं भाऊ होते आणि एकत्र संगीताचे कार्यक्रम करत होते. दोन्ही भावांनी जगात प्रसिद्धी मिळवली होती. पंडित राजन आणि साजन मिश्रा यांच्या मते, मनुष्याचे शरीर पाच तत्वांनी मिळून बनते तसं संगीताचे सात सूर सारेगामापाधानी पशुपक्षांच्या आवाजाने बनतात. काही वर्षापूर्वी दोन्ही भावांनी नैसर्गिक संकटासाठी मनुष्य जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. प्रत्येकाने आपली मानसिकता बदलायला हवी आणि निसर्गाची साथ द्यायला हवी असं ते नेहमी म्हणत होते.