नवी दिल्ली-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्यांमध्ये एक नाव खूप विशेष ठरलं. कर्नाटकच्या हरेकला हजब्बा यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हजब्बा यांची कहाणी खूप प्रेरणादायी आणि रोमांचक आहे. कर्नाटकच्या मंगलोरचे रहिवासी असलेले ६८ वर्षीय हरेकला हजब्बा एक फळ विक्रेते आहेत. दररोज अवघ्या १५० रुपयांची कमाई करत हजब्बा यांनी प्राथमिक शाळा उभारली. हजब्बा यांच्या याच अमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्राथमिक शाळा उभारण्याचा विचार नेमका कसा आला याबाबत विचारलं असता हजब्बा यांनी सांगितलेली कहाणी प्रेरणादायी आहे. काही वर्षांपूर्वी एक परदेशी पर्यटकानं हजब्बा यांच्या फळाच्या दुकानात येऊन त्यांना इंग्रजीत संत्र्याचा भाव विचारला होता. पण हजब्बा यांना इंग्रजी न कळाल्यानं त्यांना काय बोलावं हेच कळेनासं झालं होतं. त्यावर हजब्बा यांना खूप वाईट वाटलं. त्यांचं शिक्षण झालं नव्हतं आणि त्याचवेळी हजब्बा यांनी शाळा उभारण्याची शपथ घेतली. हजब्बा यांनी शपथ पूर्ण देखील केली आणि एक प्राथमिक शाळा उभारली.
गावात नव्हती एकही शाळा'द बेटर इंडिया'च्या माहितीनुसार हरेकला हजब्बा यांच्या न्यूपाडापु गावात कित्येक वर्ष एकही शाळा नव्हती. गावातील सर्व मुलं शिक्षणापासून वंचित होती. त्यानंतर २००० साली हरेकला हजब्बा यांनी आपली आजवरची सर्व कमाई खर्च करुन एक एकराच्या जागेवर शाळा सुरू केली.
"मला शिक्षण घेता आलं नाही आणि माझ्या गावातील मुलं शिक्षणापासून वंचित रहावीत असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे शाळा सुरू करण्याचं ठरवलं होतं", असं हजब्बा म्हणतात. खरंतर २०२० सालीच हजब्बा यांना पद्म पुरस्काराची घोषणा झाली होती. पण कोरोना प्रादुर्भावामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.