बंगळुरु : कर्नाटकमधील दुर्गम भागांमध्ये जाऊन महिलांची प्रसूती करणाऱ्या सुलागिट्टी नरसम्मा यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 98 वर्षांच्या होत्या.
कर्नाटकमधील दुर्गम भाग असलेल्या पवागडा तालुक्यातील कृष्णपुरा गावात महिलांच्या प्रसुतीच्यावेळी योग्य सुविधाही उपलब्ध होत नव्हत्या. अशावेळी वैद्यकिय मदतीशिवाय त्या महिलांची प्रसूती करत होत्या. सुलागिट्टी नरसम्मा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात 15 हजार महिलांची सुरक्षित प्रसूती केली होती. त्यामुळे या भागात त्यांना जननी अम्मा म्हणून ओळखले जात होते.
सामाजिक क्षेत्रात अतुलनिय योगदान दिल्याबद्दल सुलागिट्टी नरसम्मा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, तुमकुर विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविण्यात आले होते.