नवी दिल्ली - देशात गुरुवारी म्हणजे २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील एकूण १०६ नागरिकांना यंदाच्या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये, १९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून महाराष्ट्रातील झाकीर हुसेन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील १० व्यक्तींना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, एक पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ६ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. तर, गडचिरोलीपुत्र झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. खुणे यांनी आत्तापर्यंत ८०० हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे. म्हणजेच, यंदाचा पद्म पुरस्कार महाराष्ट्रासाठी मनोरंजन किंवा अभिनय क्षेत्राला देण्यात आला आहे. तर, दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे वयाचे ८८ व्या वर्षी निधन झाले. अविभाजीत बांग्लादेशच्या किशोरगंज येथे त्यांचा जन्म झाला होता. बांग्लादेशसोबतच्या युद्धावेळी त्यांनी लाईफ सेव्हींग सोल्यूशनचे निर्माण केले होते. त्यामुळे, अनेकांचा प्राण वाचले.
सन १९७१ साली पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) वर हल्ला केला होता. या युद्धावेळी साधारण १ कोटी लोक आपला जीव वाचविण्यासाठी प. बंगालच्या सीमारेषेवरील जिल्ह्यात पळून आले होते. त्यावेळी, बोनगावस्थित रिफ्युजी कॅम्पात हैजा महामारीचा फैलाव झाला होता. तर, उपचारासाठी औषधांचा पुरवठाही नव्हता. दरम्यान, डॉ. दिलीप महालनोबिस यांनी कॅम्पमध्ये ओआरएस पाठवले. ओआरएसमुळे रिफ्युजी कॅम्पमधील रुग्णांचा मृत्यूदर ३० टक्क्यांनी कमी होऊन तो केवळ ३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.