नवी दिल्ली- करणी सेनेच्या विरोधानंतरही संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पद्मावतनं आतापर्यंत 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे पद्मावत हा चित्रपट चार प्रमुख राज्यांत प्रदर्शित झालेला नाही, तरीही पद्मावतनं केलेल्या कमाईमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतात नाही, तर परदेशातही या चित्रपटानं भरमसाट कमाई केली आहे.जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत 300 कोटींपेक्षा अधिक गल्ला कमावला आहे. तर भारतातही या चित्रपटानं 150 कोटींची कमाई केली आहे. गेल्या महिन्याच्या तारखेला प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ने पेड प्रिव्ह्यूमध्येच पाच कोटी कमावले होते, दुस-याच पहिल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला 19 कोटी, 26 जानेवारीला 32 कोटी, 27 जानेवारीला 27 कोटी, 28 जानेवारीला 31 कोटी, 29 जानेवारीला 15 कोटी, 30 जानेवारीला 14 कोटी आणि 31 जानेवारीला 12 कोटी अशा प्रकारे या चित्रपटानं गल्ला जमवला आहे. मात्र तरीही परदेशात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये चित्रपट बंपर कमाई करीत आहे. एका आठवड्यातच चित्रपटाने ओव्हरसीज मार्केटमध्ये जवळपास 106 कोटींची कमाई केली. त्यामुळे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शनचे आकडे 308 कोटींपर्यंत गेले आहेत. खरंतर हा सिनेमा डिसेंबर 2017मध्ये रिलीज होणार होता, मात्र करणी सेनेचा तीव्र विरोध आणि सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यानं सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डच्या सूचनेनुसार 'पद्मावती' सिनेमाच्या नावात 'पद्मावत' असा बदल करण्यात आला होता. संपूर्ण देशभरात, विशेषतः उत्तर भारतात करणी सेनेकडून 'पद्मावत'ला तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता. एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली होती.
पद्मावत चित्रपटानं आतापर्यंत कमावला 150 कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 5:26 PM