नवी दिल्ली - संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. राजस्थान, हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीरसारख्या राज्यांमध्ये चित्रपटगृहांमध्ये तोडफोड करण्यात आली असून गोंधळ घालण्यात आला. गुरुग्रामच्या सोहना रोडवर आंदोलनकर्त्यांनी एक बस जाळून टाकली तसंच दगडफेकही केली. मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेने चित्रपटाची तिकीटविक्री करणा-या कंपनी BookmyShow ला देखील धमकी दिली आहे. 'पद्मावत चित्रपटाची तिकीटविक्री बंद करा अन्यथा विक्री करण्याच्या लायकीचं ठेवणार नाही', अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.
राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणा-या चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, असे म्हटले. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आमचे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व गोवामधील सदस्य ‘पद्मावत’चे प्रदर्शन करणार नाहीत, असे जाहीर केले. हरियाणातील गुरुग्राम येथील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील सिनेमागृहांनाही संरक्षण पुरवण्यात आले आहे.
‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर मंगळवारी अहमदाबादेत करणी सेनेने मेणबत्ती मोर्चा काढला. त्यानंतर लगेचच हिंसाचार व जाळपोळ झाली. अहमदाबादेतील अॅक्रोपोलीस, अहमदाबाद वन, हिमालय मॉल आणि सिनेमॅक्सवर हल्ले झाले. विशेष म्हणजे, या चित्रपटगृहाच्या मालकांनी आम्ही ‘पद्मावत’ दाखवणार नाही, असे जाहीर केले होते.
'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्लालज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला. मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
संजय लीला भन्साळींच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणा-या करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंह, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात बुधवारी (24 जानेवारी) ठाणे आणि डोंबिवली शहरात करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातून सुमारे २०, तर डोंबिवलीतही १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचा खेळ सुरळीत सुरू ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यात करणी सेनेच्या 15 जणांना अटक'पद्मावत' सिनेमाला विरोध करण्यासाठी २० ते २५ जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणा-या सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान १० वाहनांचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी(23 जानेवारी) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी घटनास्थळावरून १५ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.