नवी दिल्ली : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत पद्मावती चित्रपटाला देशभरात मोठ्याप्रमाणात विरोध होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी करणी सेनाने दिली आहे. दरम्यान, या वादात केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी उडी घेतली असून त्या दीपिका पदुकोणच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.
याचबरोबर पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध पाहता, उत्तर प्रदेशच्या सरकारने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, या चित्रपटात ऐतिहासित तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडली आहेत. त्यामुळे शांतता आणि कायदा सुव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिस आणि राहत्या घरी सुरक्षा वाढविली आहे. त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी सशस्त्र जवान सोबत दिले आहेत.
1 डिसेंबर 2017 रोजी पद्मावती चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन आणि अभिनेता शाहिद कपूर हा राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तसेच, अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. तर, या या चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पदुकोणचित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तसेच, हा चित्रपट ठरल्यानुसार 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केला होता.
पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध...पद्मावती या चित्रपटला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.