ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २१ - प्रसिद्ध नृत्यांगना पद्मभूषण मृणालिनी साराभाई यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले आहे. अम्मा या नावानं प्रसिद्ध असलेल्या साराभाई यांनी दर्पण अकादमीची स्थापना केली होती. अहमदाबादमधल्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, परंतु वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांची मुलगी मल्लिका साराभाई यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही दु:खद घटना कळवली आहे.
मृणालिनी साराभाई यांना २००७ मध्ये लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्या हस्ते लिजंड ऑफ इंडिया, लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डनेही गौरवण्यात आले होते.
भरतनाट्यम व कथकलीच्या नृत्यासाठी दर्पण अकादमी नावाजलेली असून आत्तापर्यंत सुमारे १८ हजार विद्यार्थी या संस्थेमधून पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. नृत्याव्यतिरिक्त नाटक व संगीताचे शिक्षणही या अकादमीत देण्यात येते. मृणालिनी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले होते. अमेरिकेत काही अवधी काढल्यानंतर त्या भारतात परतल्या आणि त्यांनी भरतनाट्यममध्ये शिक्षण घेतले.
मृणालिनी यांचे वडील डॉ स्वामिनाथन व मोठा भाऊ गोविंद स्वामिनाथन हे मद्रास हायकोर्टातले नावाजलेले वकिल होते. तर त्यांची आई अम्मू स्वातंत्र्यसैनिक होती. मृणालिनी यांची बहीण लक्ष्मी सेहगल नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये राणी झाशी रेजिमेंटमध्ये कमांडर इन चीफ होती.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे पिता मानले जाणा-या शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्याशी मृणालिनी यांचा विवाह झाला. त्यांचा मुलगा कार्तिक साराभाई सेंटर फॉर एन्व्हार्यन्मेंट एज्युकेशनचे संस्थापक आहेत, तर मुलगी मल्लिका साराभाई या कार्यकर्त्या व शास्त्रीय नृत्यांगना आहेत.