नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार, महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजाराचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने ही पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये, पंजाबमधील लंगर बाबा यांनाही हा पुरस्कार जाहीर होणार आहे.
भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत पंजाबच्या चंडीगढमधील लंगर बाबा यांचेही नाव आहे. लंगर बाबा यांचे पूर्ण नाव जगदीश लाल अहुजा असे आहे. गेल्या 38 वर्षांपासून भुकेल्यांना आणि गरजवंताना अन्न पुरविण्याचं काम ते करत आहेत. जगदीशलाल यांच्या याच सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे नाव लंगर बाबा असे पडले आहे. पीजीआय. चंडीगढच्या बाहेर गेल्या 20 वर्षांपासून दाळ-भात आणि चपाती या भोजनाचं लंगर ते लावत आहेत. दररोज 500 ते 600 व्यक्तींच्या जेवणाची सोय त्यांच्याकडून केली जाते. तर, चिमुकल्यांना खेळणीही दिली जाते. दुसऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी आपली जमिनही विकली. आपल्या आजीकडूनच त्यांना सेवेचं आणि लंगरची प्रेरणा मिळाली. भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जगदीश हे केवळ 12 वर्षांचे होते. त्यावेळी, आपल्या कुटुंबासह ते भारताच्या पंजाबमधील मानसा या शहरात वास्तव्यास आले. त्यावेळी, रेल्वे स्थानकावर फरसाण विकण्याचं कामही त्यांना करावं लागलं. त्यानंतर, ते पटयाला येथे आले, तेथे गुळ आणि फळं विकून त्यांनी उदरनिर्वाह केला. वयाच्या 21 व्या वर्षी ते चंडीगढ येथे आले. तेथे केळीचा व्यवसाय करुन त्यांनी मोठी कमाई केली.