जयपूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती या सिनेमाचे नाव ‘पद्मावत’ करून त्यास सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली असली तरी तो राजस्थानमध्ये प्रदर्शित करण्यास संमती दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जाहीर केले आहे. सेन्सॉरने संमत केलेल्या चित्रपटावर अशी बंदी घालता येते का, असा नवाच मुद्दा त्यामुळे निर्माण झाला आहे.लोकभावनांचा आदर करून राजस्थानात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही, असे वसुंधरा राजे यांनी सांगितले. या चित्रपटाचे नाव बदलण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगण्याआधी राजस्थानसह अनेक राज्यांतून विरोध झाला होता.सेन्सॉर बोर्डाने त्या चित्रपटाचे केवळ नावच बदलले नसून, त्यात ३00 हून अधिक बदल करण्यात आले आहेत. दिल्ली, मेवाड, चित्तोड या शहरांची नावे मूळ चित्रपटात होती. पण तीही काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटातील कहाणी कुठे घडली, याचा बोधच प्रेक्षकांना होणार नाही. हा चित्रपट आता २५ जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. (वृत्तसंस्था)अन्य राज्यांतही बंदी येईल?राजस्थानपाठोपाठ भाजपाशासित आणखी काही राज्ये पद्मावत चित्रपटावर बंदी घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.लोकभावनांचा आदर हेच कारण त्यासाठी दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनास मंजुरी न देण्याचा निर्णय ही राज्ये देतील, असे कळते.सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतरही हे घडणार असेल, तर संजय लीला भन्साळी अडचणीत येतील, असे सांगण्यात येते. दक्षिणेकडील राज्याकडून या चित्रपटाची फारशा अपेक्षा नाही.
‘पद्मावत’च्या प्रदर्शनास राजस्थानात परवानगी नाही, वसुंधरा राजेंचा निर्णय; सेन्सॉरने सुचविले तब्बल ३00 कट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:42 PM