भोपाळ: मध्यप्रदेशातील शाळांमध्ये आता राणी 'पद्मावती'च्या बलिदानाची कहाणी शिकवली जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उज्जैनमध्ये एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली.
'पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराणी पद्मावतीवर शाळेत धडा शिकवला जाईल. राणी पद्मावतीच्या बलिदानाची गाथा विद्यार्थी वाचतील. यासाठी त्यांना चुकीच्या माध्यमांवर अवलंबून रहावं लागणार नाही, तसंच त्यामुळे येत्या पिढीला खरा इतिहास समजण्यास मदत होईल , असं चौहान म्हणाले.
यापूर्वी सोमवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री चौहान यांनी पद्मावती सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. संजय लिला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटावर मोठा वाद उफाळून आला आहे.
राजस्थाननंतर गुजरातमध्येही पद्मावती बॅन, संस्कृतीसोबत 'खेळ' सहन करणार नाही - मुख्यमंत्री
‘पद्मावती’ या चित्रपटाच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. कारण, भाजपा सरकार असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या गुजरातमध्येही संजय लिला भन्साळींच्या पद्मावतीवर बंदी घालण्यात आली आहे. गुजरात सरकार राजपुतांच्या भावनांना ठेच पोहोचवणारा सिनेमा पद्मावतीला राज्यात प्रदर्शीत करण्याची परवानगी देऊ शकत नाही. आम्ही आमच्या इतिहासाची मोडतोड सहन करू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्ही विश्वास ठेवतो पण आमच्या महान संस्कृतीसोबत कोणाला खेळू देणार नाही, ते सहन करू शकत नाही असं मुख्यमंत्री रूपाणी म्हणाले. 190 कोटी बजेट असलेल्या पद्मावतीला राजपूत करणी सेना आणि जय राजपूताना संघ या संघटनांनी चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. त्यानंतरच्या काळात बऱ्याच राजकीय नेते मंडळींनीही चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली. मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांसोबतच दक्षिण भारतातूनही चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे.धमक्यांचं सत्र सुरुच - अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने दीपिकाला जिवंत जाळणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे. बरेलीमधील दामोदर पार्क येथे आयोजित सभेत युवा क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भुवनेश्वर सिंह यांनी घोषणा केली की, दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-या व्यक्तीला महासभेकडून एक कोटी रुपयांचं बक्षिस दिलं जाईल. दरम्यान पद्मावती चित्रपटाच्या विरोधात बरेलीत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 150 पुतळ्याचं सामूहिक दहन करण्यात आलं. दरम्यान दुसरीकडे हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली. नुकतंच काही दिवसांपुर्वी मेरठमधील एका व्यक्तीने दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला पाच कोटीच्या बक्षिसाची घोषणा केली होती. यावर बोलताना सूरजपाल बोलले आहेत की, 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार'.‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले-चित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.