नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमाचं प्रदर्शन अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. देशभरातील राजपूत संघटनांकडून होणारा विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही वाद काही केल्या कमी होत नाहीयत. 'पद्मावती' सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे शीर कापणा-या 10 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करणा-या भाजपाच्या नेत्यानं आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना इशारा दिला आहे.
हरियाणा भाजपाचे मीडिया प्रमुख संयोजक सूरज पाल अम्मू यांनी सांगितले की, '''मुख्यमंत्र्यांनी राजपूत करणी सेनेला भेटण्यासाठी वेळ दिली. मात्र बैठकीपूर्वीच मुख्यमंत्री निघून गेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट का घेतली नाही, राजपूत करणी सेनेतील सदस्य राजस्थानहून केवळ मुख्यमंत्र्यांना भेटण्याठी येथे आले होते. आम्हाला पक्षातून काढायचे असल्यास तुम्ही काढू शकता, मात्र अशा प्रकारे आमचा अपमान करू नका.'',
काही दिवसांपूर्वी सूरज पाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे शीर कापणा-याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. अम्मू यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपानं त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. पक्षाकडून नोटीस मिळाल्यानंतर अम्मू यांनी सांगितले की, जर पक्षानं राजीनामा मागितला तर राजीनामा देण्यासही तयार असल्याचे ते म्हणालेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत पद्मावती सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकू देणार नाही.
दरम्यान, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या पद्मावती सिनेमामध्ये मुख्य भूमिका आहेत. मात्र इतिहासात छेडछाड करण्यात आल्याचा आक्षेप घेत देशभरातून या सिनेमाला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे, संजय लीला भन्साळी यांनी सिनेमा बनवताना तथ्यांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.