जयपूर - पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची भीती आहे. जयपूरच्या नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. जयपूरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. धक्कादायक म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर कोळशाने लिहिलं आहे की, 'आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही'. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला असून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. मृतदेहाची ओळखही अद्याप पटलेली नाही. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या हेदेखील स्पष्ट झाले नसून, पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. तरुणाची हत्या झाली असावी किंवा त्याच्या आत्महत्येला वेगळा रंग देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाशेजारी चेतन तांत्रिकचं नाव भिंतीवर लिहिलेलं आहे. असं म्हटलं जातं की, चेतन तांत्रिक राजा रतन सिंहच्या दरबारात होता आणि तिथून हाकलल्यानंतर तो अल्लाऊद्दीन खिलजीला जाऊन भेटला. त्यानेच खिलजीला पद्मावतीबाबत सांगितलं होतं.
राजपूत करणी सेनेचे महिपाल सिंह यांनी मात्र या घटनेशी आपल्या संघटनेचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. 'आंदोलन करण्याची ही आमची पद्धत नाही. अशाप्रकारच्या आंदोलनाला लोकांनीही पाठिंबा देऊ नये', असं महिपाल सिंह बोलले आहेत.
करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी
भारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स जाळण्याची धमकी दिली आहे. 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोव-यात सापडल्यामुळे भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. पण इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिली आहे. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक यात असल्याचे लिहिले आहे. दरम्यान करणी सेनेचे नेता सुखदेव सिंग यांनी युकेमध्ये ज्या चित्रपटगृहांमध्ये पद्मावती दाखवण्यात येईल, ती सर्व चित्रपटगृह जाळण्याची धमकी दिली आहे.