वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. यामुळे दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय लीला भन्साळींच्या या सिनेमाला चांगलीच झळ बसणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजपूत समाजाने केलेल्या जोरदार विरोधामुळे आधीच भन्साळी यांनी पद्मावतीचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले आहे.
राजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडली. हा चित्रपट राजपूत समाजाचा अपमान करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या समाजाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मध्य प्रदेशात पद्मावती दाखवण्यात येणार नाही असे चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. हा सिनेमा आधी 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होता. परंतु चित्रपटावरून झालेल्या वादामुळे प्रदर्शनाची तारीख अनिश्चितरीत्या पुढे ढकलण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट दाखवण्याआधी विविध प्रसारमाध्यमांना हा चित्रपट दाखवण्यात आला यावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी टीका केली आहे. तसेच, अर्जात त्रुटी असल्याचे दाखवत सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे.
बाजीराव मस्तानीच्या यशानंतर पद्मावती या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषमा भन्साळी यांनी केली. रणबीर सिंह व दीपिका पदुकोण या यशस्वी जोडीसह शाहिद कपूरला स्थान दिले. मात्र, अल्लाउद्दिन खिलजीसोबत कथित स्वप्नातील प्रणयदृष्ये असल्याची व अन्य आक्षेपार्ह दृष्ये असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा व राजपूत समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
संजय लीला भन्साळी यांना ठार मारण्याला बक्षीसे जाहीर करण्यात आली तर दीपिका पदुकोणचे नाक कापण्याची धमकी देण्यात आली. मधल्या काळात एकदा संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या चित्रपटात राजपूत समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांनी फेटाळला आहे. तसेच चित्रपट बघितल्याशिवाय मत व्यक्त करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, राजकीय नेत्यांसह अनेक नेत्यांनी पद्मावती विरोधात भूमिका घेतल्याने हा चित्रपट अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.