मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून पद्मावती वादावर मौन बाळगल्याप्रकरणी चौघावरही टीकेची झोड उठवली आहे. 'पद्मावती सध्या ज्वलंत मुद्दा आहे. या मुद्यावर महान अभिनेते अमिताभ बच्चन, अष्टपैलू आमीर खान आणि प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांन काहीच वक्तव्य कसं केलं नाही असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. तसंच आपलं माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सर्वात लोकप्रिय पंतप्रधान (पीईडब्ल्यूनुसार) नरेंद्र मोदींनी मौन का बाळगलं आहे', असा सवाल शत्रुघ्न सिन्हा यांनी विचारला आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण संजय लिला भन्साळी यांचं हित आणि राजपुतांची संवेदनशीलता लक्षात ठेवूनच या वादावर आपण भाष्य करणार असल्याचं सांगितलं. ते बोललेत की, 'जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, संजय लिला भन्साळी यांनी आपली बाजू मांडल्यानंतरच मी बोललं पाहिजे. चित्रपट निर्मात्यांच्या हितासोबत महान राजपुतांच्या संवेदनशीलता, शौर्य आणि निष्ठा या गोष्टी लक्षात ठेवूनच मी बोलेन'.
धमक्यांचं सत्र सुरुच - अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने दीपिकाला जिवंत जाळणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे. बरेलीमधील दामोदर पार्क येथे आयोजित सभेत युवा क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भुवनेश्वर सिंह यांनी घोषणा केली की, दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-या व्यक्तीला महासभेकडून एक कोटी रुपयांचं बक्षिस दिलं जाईल. दरम्यान पद्मावती चित्रपटाच्या विरोधात बरेलीत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 150 पुतळ्याचं सामूहिक दहन करण्यात आलं.
दरम्यान दुसरीकडे हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली. नुकतंच काही दिवसांपुर्वी मेरठमधील एका व्यक्तीने दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला पाच कोटीच्या बक्षिसाची घोषणा केली होती. यावर बोलताना सूरजपाल बोलले आहेत की, 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार'.
‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकललेचित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.
राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.