पान १ विशेष मुले तीन तास ताटकळली
By admin | Published: April 11, 2015 1:40 AM
व्हीआयपींना विलंब : राजकीय नेत्यांच्या असंवेदनशीलतेचा अनुभव
व्हीआयपींना विलंब : राजकीय नेत्यांच्या असंवेदनशीलतेचा अनुभव पणजी : राज्यातील व्हीआयपींना अलीकडे सर्र्वच कार्यक्रमांसाठी खूप विलंब होऊ लागला आहे. त्याचा फटका एवढे दिवस फक्त प्रेक्षकांनाच बसे. शुक्रवारी मात्र संजय स्कूलच्या विशेष मुलांना व्हीआयपींमुळे खूपच त्रास झाला. या महोदयांना येण्यास विलंब झाल्याने तीन तास मुले ताटकळली. समाजाप्रती राजकीय नेत्यांची मने दगडासारखी संवेदनाशून्य झाल्याचा अनुभव या निमित्ताने पुन्हा आला. पर्वरी येथील संजय स्कूलच्या मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन सकाळी अकरा वाजता व्हायचे होते. सर्व कार्यक्रम अकरा वाजता सुरू करणे निश्चित होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, आमदार प्रमोद सावंत, मायकल लोबो प्रमुख पाहुणे होते. सगळे व्हीआयपी दुपारी दोन वाजता पोहोचले. म्हणजे तीन तास उशीर झाला. संजय स्कूलच्या विशेष मुलांनी व्हीआयपी येण्यापूर्वी जे नृत्य सादर केले होते, ते त्यांना व्हीआयपींसाठी पुन्हा सादर करावे लागले. ही स्थिती पाहून तेथे आणखी थांबावेसेही वाटले नाही, असे सामाजिक कार्यकर्ते राजेश दाभोळकर यांनी सांगितले. कळंगुट मतदारसंघात पुलाच्या उद्घाटनासाठी सर्व व्हीआयपी गेले होते. तो कार्यक्रम लांबल्यामुळे संजय स्कूलमध्ये येण्यास विलंब झाला; पण इथे आल्यानंतर मुलांचे कार्यक्रम पाहून मन प्रसन्न झाले, असे काही व्हीआयपींनी नंतर सांगितले. शुक्रवारी सकाळी फिरत्या मासळी विक्री केंद्राचे पणजीत उद्घाटन झाले. तो कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होणार होता; पण त्यासही व्हीआयपींमुळे विलंब झाला. बुधवारी मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या एका पुस्तक प्रकाश सोहळ्याला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर दोन तास उशिरा पोहचले.(प्रतिनिधी)