पान २ : बायणातील २०५ बेकायदा घरे खाली करण्यास ४८ तासांची मुदत
By admin | Published: April 11, 2015 1:40 AM
वीजपुरवठा, पाणीपुरवठा खात्याकडूनही जोडणी तोडण्याची नोटीस
वीजपुरवठा, पाणीपुरवठा खात्याकडूनही जोडणी तोडण्याची नोटीस१५ व १६ रोजी घरे पाडण्याचा निश्चय, सर्व यंत्रणा सज्जवास्को : काटे बायणा येथील वेर्णा-मुरगाव बंदर चौपदरी महामार्गाच्या आड येणारी तसेच बायणा समुद्रकिनार्यावर समुद्ररेषेच्या आत असलेली झोपडपीवजा घरे मिळून एकूण २०५ बेकायदेशीर घरमालकांना घरे खाली करण्यासाठी ४८ तासांची मुदत देणारी नोटीस शुक्रवारी उपजिल्हाधिकार्यांमार्फत बजाविण्यात आलेली आहे. तसेच येथील पाणी आणि वीज जोडण्या तोडण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.वेर्णा ते मुरगाव बंदरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत चौपदरी महामार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. वेर्णा ते वरुणापुरीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे; मात्र वरुणापुरी ते मुरगाव बंदरपर्यंतचा रस्ता या महामार्गात आड येणार्या घरमालकांच्या विरोधामुळे गेली १५ वर्षे रखडलेला आहे. या घरमालकांना एमपीटीतर्फे नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे, तर येथील काही मच्छीमारांना गृहनिर्माण वसाहत उभारून दिली आहे. तसेच काहीजणांचे सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाने बांधलेल्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन केलेले आहे. तरीही काही जणांनी आपली घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच एमपीटीला ७.८५ कि.मी. लांबीचा हा रस्ता पूर्ण करता येत नाही. गेल्या वर्षी या महामार्गाच्या आड येणारी सुमारे ७५ घरे सरकारने पाडली होती; पण भर पावसात ही मोहीम राबवल्याने तसेच पीडित घरमालकांचे पुनर्वसनही झाले नसल्याने सरकारला ही मोहीम आवरती घ्यावी लागली होती. ही घरे बर्याच वर्षांपासून असल्याचा दावा या घरमालकांनी केला होता; परंतु या संदर्भातील कोणतीही कागदपत्रे मामलेदारांना सादर न केल्याने ही घरे बेकायदा ठरवण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी ही घरे पाडण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार उपजिल्हाधिकार्यांनी २०५ घरमालकांना १५ व १६ रोजी ही घरे पाडणार असल्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान, ही घरे वाचवण्यासाठी घरमालकांनी गेले काही दिवस येथील मामलेदार कार्यालयासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन चालवले आहे. (प्रतिनिधी)